तळोधी (बा.) : बालकांचा हक्क, शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये वर्ग १ ते वर्ग ५ वी पूर्व प्राथमिक, वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक, वर्ग ९, १० पूर्व माध्यमिक आणि वर्ग ११ ते १२ उच्च माध्यमिक अशा प्रकारचा शैक्षणिक पॅटर्न राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यानुसार अनेक शाळांना वर्ग पाचवा जोडला आहे. मात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.नव्या नियमानुसार सत्र २०१४-१५ मध्ये ज्या शाळात वर्ग ४ थीपर्यंतचे वर्ग होते व जिथे वर्ग ५ वा आणि वर्ग ७ वा सुरु होता, तिथे वर्ग ८ वा वर्ग सुरु करण्याचे शासन आदेश निर्गमित झाले. त्यानुसार ग्रामीण भागातील काही शाळांत वर्ग ५ वा व वर्ग ८ वा सुरु झाला. परंतु हायस्कूल मध्ये असलेला वर्ग ५ वा बंद करण्याचे आदेश शासनाकडून निर्गमीत न झाल्याने यापूर्वी ज्या शाळांत वर्ग ५ वा सुरु होता, तो वर्ग पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी तेथील शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वर्ग टिकविण्याचा प्रयत्न केला या कामात काही अंशी त्यांना यशही प्राप्त झालेले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील ज्या जि.प. शाळांत ४ था वर्ग होता, तिथे आज ५ वा वर्ग व दोन शिक्षक अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यापैकी एखादा शिक्षक रजेवर किंवा प्रशिक्षण घेण्याकरिता गेला तर एकच शिक्षक आणि ५ वर्ग अशी अवस्था निर्माण होणार आहे. मग एक शिक्षक ५ वर्गांना कशाप्रकारे सांभाळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार बालकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासकीय नियोजनाअभावी प्राथमिक शिक्षणाचा बट्याबोळ झाला असून शिक्षणाच्या अधिकाराच्या नियमाची एैसीएैसी होत असल्याचे दिसून येत आहे. जि.प. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने असे चित्र उभे झाले आहेत तर खासगी शाळात वर्ग ५ वीमध्ये पुरेशे विद्यार्थी न मिळाल्याने वर्गातील पटसंख्या कमी आहे किंवा पूर्वीच्या वर्गाची संख्या कमी झाली आहे. परिणामी बरेचसे शिक्षक कमी होत आहे. शासनाकडून कुठलेही नियोजन न करता वर्ग ४ थी असलेल्या शाळांना वर्ग ५ वा का जोडला, हे न समजनारे कोडेच आहे.आता वर्ग ५ वी सुरु झाल्याने ग्रामीण भागातील शाळांना नवीन शिक्षक मिळवून देण्याकरिता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परंतु तोपर्यंत शाळेचे अर्धे किंवा संपूर्ण सत्र तर संपून जाणार नाही ना, असा प्रश्न पालकांना पडला आहे. (वार्ताहर)
शिक्षकाविना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
By admin | Published: July 09, 2014 11:22 PM