Ganesh Chaturthi 2018; चंद्रपुरात समलैंगिकांचा गणेशोत्सव; स्वातंत्र्याचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:13 AM2018-09-21T10:13:12+5:302018-09-21T10:18:42+5:30
चंद्रपुरात लेस्बियन गे बायोसेक्सुअल टान्सजेंडर (एलजीबीटी) हा समुदाय दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समलैंगिकतेला गुन्हा ठरविणारा दीडशे वर्ष जुना कायदा सहमतीने झालेल्या कोणत्याही वर्तनाबाबत गैरलागू ठरविताना सर्वोच्च न्यायालयाने दंडसंहितेतील कलम ३७७ रद्दबातल ठरविले. या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून स्थानिक लेस्बियन गे बायोसेक्सुअल टान्सजेंडर (एलजीबीटी) हा समुदाय दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या समुदायाची संबोधन ट्रस्ट ही संस्था आहे. चंद्रपूरकर या संस्थेबाबत अनभिज्ञ असावे. गे समुदायाचे नेतृत्व करणाऱ्या राज काचोळे या तरूणाने २०११ मध्ये ही संस्था स्थापना केली. संस्थेचे तब्बल ११०० सदस्य असून गे, लेस्बियन व किन्नर यांचा यात समावेश आहे.
नागपूर, अमरावती, गोंदिया, अकोला, यवतमाळ येथेही संस्थेचे सदस्य आहेत. ६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देताना ३७७ कलम रद्दबातल केले. हा निर्णय आम्हा सर्वांना स्वातंत्र्यासोबतच आनंद देणारा आहे.
त्यामुळेच या गणेशोत्सवाचे वेगळे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने यावर्षी स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून संस्थेच्या तुकूम येथील कार्यालयात गणेशोत्सव साजरा केला जात आहे, असे राज काचोळे यांनी सांगितले. यापूर्वी आम्हाला सार्वजनिक ठिकाणी भेटता येत नव्हते. लोक आमची टिंगल करायचे. परंतु या निर्णयामुळे आम्हाला आता कुठेही भेटता येणार आहे. एकप्रकारचे स्वातंत्र्य मिळाले आहे. गणेशोत्सवानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच संस्थेच्या ११०० सदस्यांसाठी प्रा. डॉ. जयश्री कापसे गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य शिबिर झाले.
या शिबिराला समुपदेशक निरंजन मंगरूळकर, शारदा लोखंडे तथा वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाची आरोग्य,एड्स व गुप्तरोग तपासणी करण्यात आली.