नागपूर : नागपुरात गांज्याची तस्करी सुरूच असून शहरातील विविध भागांमध्ये याची विक्री करण्यात येत असल्याचे चित्र आहे. नागपूर पोलिसांनी तीन तरुणांकडून जवळपास दोन किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.
मोठा ताजबागजवळील वस्तीमध्ये गांजा आणण्यात येणार असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तीन संशयित तरुणांची झडती घेतली. त्यांच्याकडे १.९९० किलो गांजा आढळून आला. अकबर सादीक अली (२४, हसनबाग), शाहबाज खान हनिफ खान (३०, खरबी रोड, हसनबाग) व शेख तौसीफ शेख नासीर (२६, हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गांज्यासह तीन मोबाईल, रोख, दोन दुचाकी असा २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींनी शेख आसीफ (ताजबाग, बाराखोली) याच्याकडून गांजा विकत घेतला होता. त्याचा शोध सुरू आहे. तीनही आरोपींना सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथकाच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गोकुल सुर्यवंशी, अरविंद शिंदे, रविन्द्र भोसकर, नाजिर शेख, नीलेश ढोणे, पुरूषोत्तम जगनाडे, बजरंग जुनघरे, महेश काटवले, सतिश ठाकरे, सतेद्र यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.