चंद्रपूर महानगरात घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे काम सुरू होते. यामध्ये घंटागाडीद्वारे काही ठराविक ठिकाणाहून हा कचरा मोटारीद्वारे उचलून तो कंपाेस्ट डेपोवर नेताना काही कचरा तिथेच राहात होता. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. नव्या कंत्राटानुसार वाहनांद्वारे थेट दाराकचरा संकलन करून तो थेट कंपोस्ट डेपोमध्ये नेला जाणार आहे. शहरात कुठेही दुर्गंधी दिसणार नाही. यासोबतच यापुढे कुठेही कंचराकुंड्यासुद्धा दिसणार नाही. ही बाब चंद्रपूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. पहिले मंजूर केलेल्या कंत्राटामध्ये काही अटीशर्ती अडचणीच्या होत्या. त्यामुळे ते कंत्राट रद्द करण्यात आले. अन्य कंपन्यांचे दर स्वयंभू कंपनीने दिलेल्या दरापेक्षा अधिक असल्याचे हे कंत्राट या कंपनीला देण्यात आले. हे कंत्राट पूर्वी दहा वर्षांसाठी दिले होते. आता ते सात वर्षांसाठी असून हे कंत्राट कधीही रद्द करता येईल, अशी तरतुद आहे.
विरोधी पक्षाचे गटनेता कंत्राटाच्या बाजुने
स्थायी समितीच्या अखत्यारीत हा विषय आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार हे कंत्राट दिले गेले आहे. या कंत्राटाच्या प्रक्रीयेला महापालिकेतील विरोधी पक्षातील गटनेत्याचीही अनुमती आहे. आतापर्यंत एकाही नगरसेवकाने या कंत्राटाला विरोध दर्शविला नाही. एकही तक्रार कुणी केलेली नसल्याची बाब महापौर राखी कंचर्लावार व स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी स्पष्ट केली.
कंत्राटातून घोटाळ्याची दुर्गंधी - रामू तिवारी
मनपाने एकाच कंपनी आधी दिलेला १७०० रुपयांप्रमाणेचा कंत्राट रद्द करून त्याच कंपनीला २५५७ रुपयाच्या दराने दिला. हा कंत्राट वाढीव दरानेच द्यायचा होता तर तो आधीच का दिला नाही. एकदा मंजूर झाल्यानंतर तो कंत्राट रद्द करून नव्याने वाढीव दराने दिला. यावरून या कंत्राटात मोठ्याप्रमाणावर आर्थिक घोटाळा असल्याचा गंभीर आरोप काॅंग्रेसचे चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.