योजनेचे उद्घाटन : वादग्रस्त प्रकरणावर पडदाचंद्रपूर : मागील अनेक महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांच्या आपसी वादात अडकलेली घराघरांतून कचरा संकलित करण्याची योजना अखेर कार्यान्वित होणार आहे. उद्या १३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता या योजनेचे गांधी चौकात महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.घराघरातून कंचरा संकलित करण्याचे कंत्राट महानगरपालिकेच्या वतीने नागपूर येथील मे. सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट या कंपनीला देण्यात आले. तेव्हापासून हे कंत्राट वादात अडकले होते. अतिशय जादा किमतीत हे कंत्राट देण्यात आल्याने यात नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढिया यांच्यासह काही नगरसेवकांनी केला होता. त्यानंतर या कंत्राटाची नागपूर येथील कंत्राटाशी तुलनाही करण्यात आली होती. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार झाल्यानंतर आयुक्त सुधीर शंभरकर यांनीही कंत्राटदाराने दर कमी करावे, असे निर्देश दिले होते. काही दिवसांपूर्वी आ. नाना श्यामकुळे यांनी यात मध्यस्थी करीत ५४ लाख प्रति महिना असे असलेले हे कंत्राट तीन लाखांनी कमी करून ५१ लाख प्रति महिन्यावर आणले. त्यानंतर या वादग्रस्त कंत्राटाचा मार्ग मोकळा झाला. १३ जुलै रोजी या योजनेचे महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यानंतर याच दिवसापासून चंद्रपूर शहरातील घराघरातून कचरा संकलित करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)
आजपासून होणार घराघरांतून कचरा संकलन
By admin | Published: July 13, 2015 1:09 AM