फोटो : गावाला लागून असलेल्या कचरा यार्ड
घुग्घुस : घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा मिळून सहा महिने झाले असले, तरी प्रशासकाकडून कोणतेही नियोजन झाले नसल्याने गावातील समस्या अधिक तीव्र होत आहे. लोकवसाहतीला लागूनच कचरा यार्ड असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
जानेवारीत घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. प्रशासक म्हणून शासनाने चंद्रपूरचे तहसीलदार यांच्याकडे प्रभार सोपविला. मात्र सहा महिन्यांत कदाचित आठ दिवसही कार्यालयात बसले नाही. ते गेल्या एक दीड महिन्यापासून रजेवर असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.
येथील वाॅर्ड क्रमांक १ मध्ये लोकवसाहतीच्या मध्यभागी क्रीडांगण होत आहे. त्या जागेवर गावातील सर्व कचरा घंटागाडीने जमा करून टाकला जात आहे. त्यात प्लास्टिकही असते. जनावरे हे प्लास्टिक खातात. येथील कचरा उडून नागरिकांच्या घरात जात आहे. कचरा पेटविला, तर पूर्ण धूर त्या परिसरात पसरून नागरिकांना त्रास होत आहे. हा कचरा यार्ड तत्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी वेळोवेळी होत असली, तरी याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.