उमरेड बसची मागणी
चंद्रपूर : कोरपना येथून वणी-चिमूरमार्गे उमरेड बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या बससेवेमुळे कोरपना येथील नागरिकांसह वणी, वरोरा, चिमूर परिसरातील प्रवाशांना सोयीचे होईल. या संदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.
फलक नसल्याने प्रवाशांना त्रास
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यांवर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे.
कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
वरोरा : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्रे मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, ते रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला ही कुत्री कळपाने असतात. अनेक वेळा रात्री दुचाकींच्या मागे कुत्री धावतात. ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
फवारणी करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही मोकळ्या भूखंडावर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे याचाही धोका नागरिकांना आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या सहा वाहनचालकांवर पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली. यामध्ये बल्लारपूर पोलिसांनी तीन, ब्रह्मपुरी सहा, तर वरोरा पोलिसांंनी एक वाहनचालकावर कलम भां.द.वि. २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.