घोसरी : नांदगाव येथील सिंधलताई राठोड आदिवासी आश्रमशाळेची गत २० वर्षांपासून स्वतंत्र इमारत उभारली असून, आश्रमशाळेतील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आता या आश्रमशाळेची इमारतच अतिक्रमात आहे. एका राजकीय पुढाऱ्याने जागेवर हक्क दाखवून शाळेचा मार्ग बंद केल्याने खळबळ उडाली आहे.
मूल तालुक्यातील मौजा नांदगाव येथील सिंधलताई राठोड आदिवासी आश्रमशाळेची इमारत बांधण्यासाठी संस्थाचालक सुधाकर राठोड यांनी गजानन अहीरकर यांच्याकडून जमीन खरेदीबाबतचा व्यवहार झाला असल्याचे कळते.
संस्थाचालक व जमीनमालक दोघांचाही मृत्यू झालेला आहे. परंतु २० वर्षांपासून आश्रमशाळेची इमारत उभी झालेली आहे. आता विनोद गजानन अहीरकर यांनी या आश्रमशाळेची इमारत माझ्या जागेत असल्याचा हक्क दाखवून आश्रमशाळेच्या मार्गावर जाळी लावून बंद केले असल्याने आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचे आवागमन बंद झाले आहे.
कोरोनामुळे आश्रमशाळेत विद्यार्थी येत नसले तरी दहावी- बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून, त्यांंचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थाचालकसुध्दा चुप्पी साधून आहेत.