नागभीड : या वर्षी गावरान आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर आणि अनुकूल वातावरण लक्षात घेता विक्रमी फळधारणा होईल, असे दिसत आहे. असेच वातावरण राहिले तर गावरान आंबा उन्हाळ्याची चांगलीच लज्जत वाढवणार आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ झाला आहे. या वर्षी प्रथमच गावरान आंब्याची झाडे बहराने मोठ्या प्रमाणावर मोहोरली आहेत. उल्लेखनीय बाब ही की, या मोहोराला वातावरणही अनुकूल आहे. जेव्हापासून आंबे मोहोराला सुरुवात झाली तेव्हापासून एकदाही आभाळ किंवा वादळ आले नाही. त्यामुळे जसा बहर आला तसाच बहर कायम आहे. म्हणून या वर्षी मोठ्या प्रमाणावर फळधारणा होईल असा अंदाज आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. उन्हाळ्यातील तप्त उन्हावर मात करण्यासाठी नागरिक विविध साधनांचा वापर करीत असतात. उन्हाळ्यात शरीराला गारवा देणाऱ्या व अंगाची काहिली कमी करणाऱ्या साधनांत आंब्याचाही समावेश आहे. आंबा म्हटले की, कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार? कैऱ्या असोत की परिपक्व झालेले आंबे. नाही तर पिकलेले आंबे. प्रत्येकालाच ते हवेहवेसे वाटतात. सध्या संकरित आंब्यांचा बाजारात हैदोस वाढला असला तरी खेड्यापाड्यांत गावरान आंब्यांना मोठी मागणी असते. एवढेच नाही तर, रसायनाने पिकवलेल्या आंब्यांपेक्षा गावरान आंबे बरे म्हणून शहरवासीयसुद्धा हे गावरान आंबे मुद्दाम मागवून घेत असतात. असेच वातावरण कायम राहिले तर हे गावरान आंबे उन्हाळ्याची लज्जत निश्चित वाढवणार आहेत.