चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे गाफिल न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या लोकांचा कल मास्क न वापरण्याकडे दिसत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचनेनुसार मास्क’ची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. बुधवारी महाकाली मंदिर मार्गावर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना थांबवून नम्रतापूर्वक व सौजन्यतेने मास्क घालूनच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी मंगळवारी दिलेल्या निर्देशानुसार मास्कची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शहरी भागात दुकानांच्यावेळा ठरवून दिल्यानंतरही त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. चार वाजेनंतर संबंधित आस्थापने बंद झाली पाहिजेत. त्यासाठी महानगरपालिकेच्या तिन्ही झोनच्या टीम पुन्हा सक्रिय कराव्यात, अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या.
बुधवारी महाकाली मंदिर मुख्य रस्त्यावर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी घराबाहेर निघताना मास्क लावूनच निघावे, अशा नम्रतापूर्वक व सौजन्यतेने सूचना देण्यात आल्या. ही मोहीम वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) अमोल शेळके यांच्यासह झोनचे शिपाई यांच्या उपस्थितीत पार पडली.