गडचांदूर येथील संत जगन्नाथ बाबा मंदिराच्या सभागृहात आयोजित विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनासाठी शहीद चौक नागपूर येथे १५ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. तरुणांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही कायम असून बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वेगळा विदर्भ झाल्यास विदर्भातील युवकांना नोकरी प्राप्त होतील. त्यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा कृषिपंपाचे बिल माफ करता येईल. तेलंगणाच्या धर्तीवर वेगळ्या विदर्भाचा सुद्धा विकास चांगल्या प्रकारे करता येईल. छोटी राज्य विकसनशील राज्य या संकल्पनेप्रमाणे वेगळ्या विदर्भाची मागणी अत्यंत रास्त असून केंद्रातील सरकारला वेगळ्या विदर्भ राज्याचा आता विसर पडत चाललेला असलेला दिसून येत आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे नेते मात्र आता विदर्भाविषयी बोलताना दिसत नाही. याचे दुःख वाटत असल्याचे ते म्हणाले. वेगळ्या विदर्भाच्या मागणीची केंद्राने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, प्रवीण गुंडावार, रवी गोखरे, मदन सातपुते, रमेश नडे, रमाकांत मालेकर, प्रभाकर लोडे, प्रवीण एकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी तयार व्हा : ॲड. वामनराव चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 4:06 AM