जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : राष्ट्रवादी मजदूर संघटनेची मागणी चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दहा रुपयांच्या नाण्यासंदर्भात अघोषित स्वरूपाची बंदी निर्माण झाल्याचे भयाण चित्र उभे राहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीबांना याचा फटका बसत आहे. ५०० व १००० रुपयांच्या नोटबंदीनंतर दहा रुपयांचे नाणेदेखील बाजारात छोट्या व्यापाऱ्यांनी घेण्यास मनाई केलेली आहे. यामुळे घराघरात चिल्लर जमा करुन ठेवणाऱ्या गृहिणी तसेच शाळेकरी मुलांवर तसेच सर्वसामान्यांवर संकट उभे झालेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील भ्रम दूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी मजूर संघटनेने केली आहे.चंद्रपूर व घुग्घुस मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहकाने ज्येष्ठ वयोवृद्ध महिलेचे दहा रुपयांचे नाणे घेण्यास मनाई केली. यासंदर्भात त्याला विचारणा केली असता त्याने स्टेट बँक आॅफ इंडियातर्फे दहा रुपयाचे नाणे चलणात असून एक वैध आहेत व एक अवैध आहे, असे स्पष्टीकरण दिले व दहा रुपयांचे नाणे घेण्यास आम्हाला मनाई करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे त्या वयोवृद्ध महिलेला मनस्ताप सहन करावा लागला व अशास स्वरूपाचे वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरु आहेत.याची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी सिमेंट मजदूर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. या दहा रुपयांच्या नाण्यासंदर्भातील भ्रम तत्काळ दूर करुन योग्य दिशानिर्देश देण्याची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये कामगार नेते- सैय्यद अनवर, घुग्घुस शहराध्यक्ष श्रीनिवास गोस्कूला, संजय भोंगळे, दिलीप पिट्टलवार, सत्यनारायण डकरे, मनोहर भरणे, बापूजी क्षीरसागर, भिमराव चांदेकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
दहा रुपयांच्या नाण्यासंदर्भातील भ्रम तत्काळ दूर करावा!
By admin | Published: January 19, 2017 12:52 AM