चंद्रपूर : संजय गांधी निराधार योजनेतील शहरी भागातील तहसीलदारांचे पद रिक्त असल्यामुळे योजनेतील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे येथे अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, सोबतच विशेष मोहीम राबवत प्रलंबित असलेली प्रकरणे जलदगतीने मार्गी काढावीत, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांची भेट घेऊन केल्या. यावेळी योजनेच्या प्रक्रियेत लाभार्थ्यांना होत असलेल्या अडचणींवरही त्यांनी प्रकाश टाकला.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणारी प्रकरणे मार्गी काढण्यासाठी शहरी व ग्रामीण असे दोन तहसीलदार नेमण्यात आले आहेत. मात्र, योजनेतील शहरी भागातील तहसीलदाराचे पद रिक्त असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. त्यामुळे विभागातील रिक्त असलेल्या पदांवर अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणीही केली आहे.