लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने मतदारयादी जाहीर करून दोन आठवडे होत आहेत. ही यादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय व संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, अनेकांनी यादीकडे ढुंकूनही पाहिले नसल्याची माहिती आहे. याबाबत 'लोकमत'ने गुरुवारी (दि. १९) विचारणा केली असता कुणी म्हणाले, सध्या वेळ नाही, तर कुणी म्हणताहेत नंतर बघू, अशी उत्तरे मिळाली आहेत.
१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयादी ३० ऑगस्ट २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदारयादीत आपले नाव आहे की नाही, ते लगेच तपासावे, मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नावनोंदणी किंवा नाव वगळणे ही प्रक्रिया सुरू राहते. त्यामुळे नागरिकांनी संबंधित ठिकाणी जाऊन नाव तपासावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले होते. काही नागरिक यादी लावलेल्या स्थळापासून जातात. मात्र, त्याकडे पाहात नसल्याचे उघडकीस आले.
युवकांनाही यादीचे वावडे
- जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची संख्या केवळ १० हजार ४८८ ने वाढली. सध्याच्या यादीनुसार जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदा- रसंघ मिळून ३३ हजार ८२५ युवा मतदार आहेत. यामध्ये १८ हजार ८०१ पुरुष, १५ हजार २२ स्त्री आणि २ इतर मतदार यांचा समावेश आहे.
- जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता ही संख्या एक लाखांच्या घरात असायला हवी होती. मात्र, युवकांनीही मतदारयादीकडे सध्या तरी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
अशी करा आपल्या नावाची खात्री
- आगामी मतदारयादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय वा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
- यादीत नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा व्होटर्स हेल्पलाइन अॅप अथवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलद्वारे अर्ज नमुना क्रमांक सहा भरून नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.