चंद्रपूर : चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे पात्र पूर्णत: उथळ झाले आहे. मोठ्या प्रमाणात झाडेझुडपेही वाढली आहे. खोलीकरणाच्या मागणीला घेऊन मागील अनेक वर्षांपासून सातत्याने प्रशासन, लोकप्रतिनिधींनी निवेदन देण्यात आले. मात्र, अजून तरी याबाबत उपाययोजना झाल्या नाही. त्यामुळे आता ‘गेट वेल सून’ म्हणत बुधवार, दि. १४ फेब्रुवारीला प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना गुलाब फूल व निवेदन देऊन दाताळा पूल ते हडस्तीपर्यंत खोलीकरणाची मागणी करण्यात येणार आहे.
इरई बचाव जनआंदोलनाद्वारे जलसंपदा दिन २२ मार्च २००६ पासून नदीच्या खोलीकरणाची मागणी सातत्याने करीत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सामान्य नागरिक जुळले आहे. मात्र, शासन- प्रशासनाने या नदीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी गुलाब पुष्प तसेच निवेदन देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इरई बचावचे संयोजक कुशाब कायरकर यांनी केले आहे.