चंद्रपूर : स्वच्छतागृहात इतरत्र टाकून टाकलेले सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावली नाही यासाठी मुख्याध्यापिकेने २३ विद्यार्थिनींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांनी केलेला प्रकार दाखविला. स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे काही विद्यार्थिनींनी ओकाऱ्या केल्या तसेच चक्कर आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, घटनेनंतर काही पालक तसेच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन झालेल्या प्रकाराचा जाब विचारला. या घटनेमुळे मात्र शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
येथील अष्टभुजा प्रभागात नटराज इंग्रजी स्कूल आहे. या शाळेमध्ये शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी सात ते दहावीच्या २३ विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नाही. या कारणासाठी मुख्याध्यापिका सीमा सरकार यांनी स्वच्छतागृहात नेऊन स्वच्छतागृहातील इतरत्र विखुरलेले सॅनिटरी पॅड दाखवून ज्यांनी -ज्यांनी इतरत्र पॅड टाकले त्यांनी उचलण्याचे बजावले. जोपर्यंत सॅनिटरी पॅड उचलणार नाही, तोपर्यंत स्वच्छतागृहातच ठेवण्याचा दमही दिला. यानंतर मुलींनी स्वच्छतागृहातील पॅड उचलले. स्वच्छतागृहात काही वेळ रहावे लागल्याने काही विद्यार्थिनींना त्रास होऊ लागला. यातील दोन विद्यार्थिनीला चक्कर तसेच काहींना उलट्या झाल्या.
दरम्यान हा प्रकार काही पालकांना समजताच पालकांनी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे यांना माहिती दिली. त्यांनी युवती सेना जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन शाळेत धडक दिली. दरम्यान मुख्याध्यापिका सरकार यांना याबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी काही पालकांनी तक्रार केली तर काही पालकांनी मुलींना शिस्त लावण्यासाठी मुख्याध्यापिकेने बरोबर केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत शिक्षण विभागासह, जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देण्यात येणार असल्याचे युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.