जागा भरल्या : विद्यार्थिनी प्रवेशापासून वंचितचंद्रपूर: आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना आहेत. मात्र, त्या कागदावरच असतात, याची प्रचिती शनिवारी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बघावयास मिळाली. दुर्गम भागातील विद्यार्थिनींना अद्याप वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पालकांसह सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घातला. आदिवासी समाजातील मुलींसाठी चंद्रपुरात दोन वसतिगृहे आहेत. यातील एका वसतिगृहाची ७५, तर दुसऱ्या वसतिगृहाची १२५, अशी क्षमता आहे. त्यासाठी आदिवासी समाजातील दुर्बल घटकातील मुलींना प्रवेश दिला जातो. उच्चशिक्षणासाठी चंद्रपुरात येणाऱ्या या समाजातील मुलींना याच वसतिगृहाचा आधार आहे. या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया आता आॅनलाईन करण्यात आली. यावर्षी जून महिन्यात ती पार पडली. यामध्ये अनेक मुलींनी अर्ज केला होता. मात्र, सप्टेंबर महिना लोटल्यानंतरही प्रवेशप्राप्त आणि प्रवेश नाकारलेल्या मुलींची यादी जाहीर करण्यात आली नाही. याबाबत वसतिगृहाच्या अधीक्षकाला विचारणा केली असता त्यांनी सर्व जागा भरल्याचे सांगितले. त्यामुळे या मुलींनी पालकासह सहायक प्रकल्प अधिकाऱ्याचे कार्यालय गाठले. मात्र, सर्व जागा भरल्या आहेत, असे सांगत त्यांनी या मुलींना पिटाळून लावले. त्यानंतर मुलींनी आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षांना ही हकिकत सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. वसतिगृहाची क्षमता कमी आहे. १२५ विद्यार्थ्यांची येथे क्षमता आहे. मात्र त्यात केवळ शंभरी मुलीच राहू शकतात. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. निवड झालेल्या मुलींची सूची लावणे आवश्यक होती. ती जबाबदारी वसतिगृहाच्या अधीक्षकांची होती, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वाहणे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
वसतिगृहात प्रवेशासाठी मुलींचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2015 12:52 AM