सुधीर मुनगंटीवार : २५१ ज्येष्ठ नागरिकांचा अम़ृतमहोत्सवी सोहळा चंद्रपूर : येथील ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या मागणीनुसार येत्या महिनाभराच्या आत रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या राज्याचा मंत्री म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण सदैव ज्येष्ठ नागरिक संघाच्या सोबत असल्याची ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे आयोजित २५१ ज्येष्ठ नागरिकांच्या अमृत महोत्सवी सोहळयात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष विजय चंदावार आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर मनपा क्षेत्रात ९ योग केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यासाठी ६.५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हयातील सर्व नगर परिषद क्षेत्रात प्रत्येक ओपनस्पेसमध्ये योगकेंद्र स्थापन करण्याचे नियोजन करण्यात येत असून चंद्रपूर शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यानातसुध्दा योग केंद्र स्थापन करण्यात येईल व याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असेही ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. ज्येष्ठ नागरिक हा या समाजाचा प्रमुख घटक असून त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता व जबाबदारी आहे. त्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्रीहंसराज अहीर यांनी केले. यावेळी आ. नाना शामकुळे यांचेही भाषण झाले. स्वागताध्यक्ष विजय चंदावार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. प्रास्ताविक सचिव केशव जेनेकर यांनी केले. संचालन रमेश मुलकलवार यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष गोसाई बलकी, कोषाध्यक्ष प्रभाकर घटटूवार, सहसचिव अरूण दंतुलवार, अशोक संगीडवार, सुधीर मुनशेटटीवार, मोहन रायपुरे, मारोतराव मत्ते, अरविंद मुच्चूलवार, दादाजी नंदनवार, महादेव वांढरे, सरोज उपगन्लावार बोनगीरवार आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)इरईचे पुनरूज्जीवन करून इरई रिव्हर फ्रंटइरई नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून गुजरातमधील साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर इरई नदी रिव्हर फ्रंट तयार करण्यात येत आहे. याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येतील. चंद्रपूर शहरातील मुख्य बसस्थानकाचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार असून तेथेसुध्दा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा करण्यात येतील. म्हाडाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरे उपलब्ध करण्याची योजना प्रस्तावित आहे. यावरही लवकरच कार्यवाही करण्यात येईल. नोव्हेबर महिन्यात चंद्रपुरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित विख्यात तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची विशेष तपासणी या शिबिरात करण्यात येईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी रूग्णवाहिका देणार
By admin | Published: October 11, 2016 12:45 AM