लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील मूर्ती परिसरात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी प्राधिकरणाकडून जमीन संपादीत केली जाणार आहे. या परिसरात प्रामुख्याने आदिवासी कोलाम शेतकऱ्यांच्या अतिक्रमित जमिनी असून त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे अन्य साधन नाही. त्यामुळे अतिक्रमित जमिनीचाही कायद्यानुसार मोबदला देवूनच संपादन करा, अशी मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.मूर्ती व नलफडी परिसरात शासनाने विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला. प्रस्ताव मंजूर झाला असून कामालाही सुरुवात झाली आहे. शासनाकडून सध्या सर्व्हेक्षणाचे काम केले जात आहे. या परिसरात मागील २५ वर्षांपासून आदिवासी कोलाम समाजातील नागरिकांनी अतिक्रमण करून शेतीवर उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु, शासनाने अजूनही त्यांना जमिनीचे पट्टे दिले नाही. मूर्ती परिसरातील आदिवासी कोलाम बांधवांना जगण्याचे अन्य साधन नाही. विमानतळासाठी जमीन ताब्यात घेताना पट्टे नाही, या कारणाखाली मोबदला नाकारल्यास आदिवासींचे हाल होतील. अतिक्रमित शेतकऱ्यांना पट्टे वितरित करून इतर जमिनीला मिळणाºया मोबदल्याप्रमाणे यांनाही प्रचलित दरानुसार आर्थिक मोबदला व वारसांना नोकरी देण्याची मागणी आहे. बाबूपेठ उड्डाणपुलाचे जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना शासनाने मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अतिक्रमित शेती असलेल्या कोलाम आदिवासींनाही शासनाने इतर जमिनीच्या दराप्रमाणे मोबदला द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी हरी झाडे, विठ्ठल येवले, किसन मुसळे, नितीन बांबटकर, रामभाऊ देवईकर, अविनाश नगराळे, प्रमोद कुमरे, विजय साळवे, गंगाधर बोधे, माधव कुळमेथे, भाऊराव पुणेकर, तानाजी कुळमेथे, झिबला शेंडे, मारोती ताकसांडे, मारोती टेकाम आदी उपस्थित होते.
मूर्ती परिसरातील अतिक्रमित जमिनीलाही मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:03 AM
तालुक्यातील मूर्ती परिसरात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी प्राधिकरणाकडून जमीन संपादीत केली जाणार आहे. या परिसरात प्रामुख्याने आदिवासी कोलाम शेतकऱ्यांच्या अतिक्रमित जमिनी असून त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे अन्य साधन नाही.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस : मुख्यमंत्र्यांकडे पाठविले निवेदन