: मुख्यमंत्री यांना निवेदन सादर
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने शेतकऱ्यांचा शेतमाल सक्षम संस्थांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांची आधारभूत देय रक्कम मिळवून देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला असता महत्प्रयासाने कोविड काळात शासनाने ४२ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असली तरी मात्र प्रति क्विंटल मागे ७०० रुपये राज्य शासनाने घोषित केलेला बोनस देणे अजूनही प्रलंबित आहे.
लॉकडाऊन काळातच शेती हंगाम सुरू झाला असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेत आमदार बंटी भांगडिया यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित बोनस देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी दि महाराष्ट्र स्टेट ऑफ कॉपरेटिव्ह फेडरेशन लिमी या सक्षम संस्थेने आधारभूत दराने धान खरेदी केली होती. परंतु, राज्य शासनाने धान खरेदीची रक्कम व बोनस देण्यास विलंब केल्याने कोरोना काळदरम्यान बळिराजा हवालदिल झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जात होता. तेव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आमदार भांगडिया यांनी लक्ष घालून शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून अखेर ७ मेच्या दरम्यान ४२ कोटी ८८ लक्ष ७४ हजार ६६७ रुपये शासनाने धान खरेदीची मूळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली.
आता शेतकऱ्यांचे हक्काचे बोनस देणे मात्र बाकी आहे.
शासनाने घोषित केल्याप्रमाणे प्रति क्विंटल ७०० रुपयेप्रमाणे १२ मार्च २०२१ नंतरच्या २ लाख २९ हजार ५९०.२९ क्विंटल खरेदी धानाचे अंदाजे १६.०७ कोटी रुपयांचे बोनस थकीत आहे. सध्याची स्थिती कोरोना लॉकडाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ बोनस देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून आ. भांगडिया यांनी केली आहे.