कोरपना : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, कोरपना ते वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
कोरपना ते वणी हा ४२ किलोमीटरचा मार्ग आहे. यातील वणी ते चारगाव चौकीपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे, परंतु चारगाव चौकी ते कोरपना हा ३२ किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो आहे. अलीकडेच वरोरा ते वणी राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. हा महामार्ग कोरपना पर्यंत थेट जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गाला सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. हा महामार्ग झाल्यास कोरपना व वणी परिसरातील सिमेंट, कोळसा, जिनिंग प्रेसिंग, गिट्टी खदानच्या जड वाहतुकीसाठी व दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रवास करण्यासाठी सोयीचा होईल. शिवाय कोरपना पासून नागपूर पर्यंत १७५ किलोमीटरच्या प्रवासासाठीही हा मार्ग सोयीस्कर होईल.