बसस्थानक नसल्याने गैरसोय
चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गडचांदूर, भिसी, माजरी, नवरगाव, दुर्गापूर, विसापूर , कोठारी या महत्त्वपूर्ण ठिकाणी सुसज्ज बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
तुळशीनगरातील रस्त्याचे सिमेंटीकरण करा
चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागात जनजागृती करावी
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात आहेत. त्यामुळे जनजागृती करणे गरजेचे आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
चंद्रपूर : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी इंटरनेटसह संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
जिल्ह्यात वाढीव टाकीचा अभाव
वरोरा : शहराचा विस्तार वाढत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्याची गरज आहे. नगरपंचायतीने याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वरोरा शहरातील काही वॉर्डांना अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय अनेक नागरिक नळाला टिल्लूपंप लावत असल्याने काही भागातील लोकांना अपुरे पाणी मिळत आहे.
गडचांदूर-जिवती मार्गावर झुडुपांचे साम्राज्य
गडचांदूर : शहरापासून जवळच जिवतीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचांदूर ते जिवती मार्ग हा दोन्ही तालुक्यांना जोडणारा आहे. या मार्गाने नेहमीच वाहनांची वर्दळ असते.
गुळगुळीत रस्ते झाले खाचखळग्यांचे
सावली : येथे नळ योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. शहरातील काही वॉर्डांत अंतर्गत सिमेंट रस्ते फोडून पाईप टाकण्यात आल्या. मात्र पाईप टाकून त्यावर केवळ माती टाकण्यात आली. त्यामुळे शहरातील गुळगुळीत असणारे रस्ते खाचखळग्यांचे झाले आहेत.
परवाना शिबिराचे आयोजन करावे
जिवती : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने तालुक्याच्या ठिकाणी ठराविक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र कोरोनामुळे अशा शिबिराचे आयोजन बंद केले आहे.
व्यावसायिकांकडून रस्त्यावर कचरा
चंद्रपूर : येथील काही छोटे फळविक्रेते रस्त्याकडेला फळ विक्री करीत आहेत. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते रस्त्यावरच कचरा टाकत असल्यामुळे चंद्रपूरच्या सौंदर्यात बाधा निर्माण होत आहे. अनेकवेळा दिवसभर कचरा उचललाच जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.