लैंगिक समित्यांचे गठण करावे
चंद्रपूर : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी कार्यालयीन स्तरावर अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याचे आदेश होते. मात्र अद्यापही जिल्ह्यातील काही कार्यालयात या समित्यांचे गठण झाले नसल्याचे वास्तव आहे. कार्यालयात दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी किंवा अधिकारी कार्यरत असेल, त्या सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील सर्व कार्यालय, संस्था, दुकाने आदी ठिकाणी अधिनियमानुसार सदर समिती गठित करणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा
चंद्रपूर : जिवती, पोंभुर्णा, मूल, सिंदेवाही, सावली, राजुरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये तसेच सार्वजनिक शौचालय आहेत. मात्र अनेकजण या शौचालयाचा वापर न करता बाहेर जातात. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत.
घंटागाडी नियमित पाठविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील काही वाॅर्डात घंटागाडी अनियमित येत असल्याने नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अडचण जात आहे. त्यामुळे या परिसरात दररोज घंटागाडी पाठवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
श्रावणबाळ निराधार योजनेचे अनुदान द्यावे
चंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान थकीत आहे. परिणामी लाभार्थ्यांना अडचण जात आहे. लाभार्थ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. लाभार्थी बँकेत दररोज पैशासाठी चकरा मारत आहेत. मात्र पैसे आले नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे. त्यामुळे अनुदान जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
लहान व्यावसायिक ग्राहकांच्या सेवेत
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये ग्राहक लहान व्यावसायिकांकडून जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे. विशेष म्हणजे, अन्य वेळी मोठ्या दुकानातून खरेदी करणारे ग्राहकही आता छोट्या व्यावसायिकांना महत्त्व देत आहे.
मानधन वेळेवर द्यावे
चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांना आधीच तुटपुंजे मानधन देण्यात येते. त्यातही अनियमित मानधन देण्यात येते. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
मानधन वेळेवर द्यावे अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.