चंद्रपूर : जीवनात अशक्य असे काहीही नाही. कामाच्या नियोजनामुळे कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय क्षेत्राच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येऊन राष्ट्रनिर्माण व राष्ट्र विकासासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले.
छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय, मोरवा येथे त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव ठोंबरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे संचालक डॉ. उत्तरवार, वन अकादमी चंद्रपूर येथील सल्लागार माधमशेट्टीवार, संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर खरवडे, प्रभारी प्रा. मनोज ढोलणे, संस्थेचे सहसचिव प्रा. दिलीप चौधरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयास यूजीसी दर्जा मिळवून देण्यासाठी विद्यापीठाने केलेल्या मार्गदर्शनासाठी कुलगुरूंचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. वरखेडी म्हणाले, प्रशासकीय सेवा या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासोबतच इतरही अनेक क्षेत्रात भविष्य घडविण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगून छात्रवीर राजे संभाजी महाविद्यालयाचा गौरव केला. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.