चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवीच्या यात्रेत दूरवरून भाविकगण चंद्रपुरात दाखल झाले असून त्यांना आई महाकालीच्या दर्शनाची आस लागली आहे. दर्शन घेण्याची एकमेव आशा बाळगून असलेले भक्त मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत. या भाविकांच्या गर्दीमुळे महाकाली मंदिराचा परिसर सध्या फुलून गेला आहे. मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. माता महाकालीची अंतर्मनात भक्ती असून डफड्याच्या तालावर नाचणारे भक्त लक्ष वेधून घेत आहेत. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मूहूर्त साधून झरपटच्या पात्रात पवित्र स्रान करण्याची देवी महाकालीच्या भक्तांची परंपरा आहे. या स्रानानंतर दर्शनाच्या रांगेत लागून दर्शन घेण्यासाठी त्यांची लगबग असते. कुटुंबातील बायकापोर तसेच वृद्धांसह आलेलेही अनेक जण यात सहभागी होत आहेत. यावर्षी शुक्रवारी चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मूहूर्त आहे. अजूनही भाविकांचे जत्थे दाखल होणे सुरूच आहे. परिसरात फिरणारे पोतराजे आणि लयबद्धपणे वाजणाऱ्या डफड्यांमुळे हा परिसर सध्या दिवसरात्र निनादतो आहे. भाविकांसाठी मंदिर परिसरात दानशूर मंडळींनी विशेष व्यवस्था केली आहे. यावर्षीही किशोर जोरगेवार यांनी महिलांसाठी तात्पूरते स्नानगृह उभारले आहे. या यात्रेला विदर्भ, मराठवाड्यासह तेलंगणा व अन्य राज्यातून भाविक दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहे. यात्रा परिसरात विविध दुकाने सजली आहे. सर्व भाविक माता महाकालीच्या दर्शनासाठी आतूर झालेले आहेत.
चंद्रपूरचे आराध्य दैवत : देवी महाकाली यात्रा दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:42 PM