चंद्रपूर :चंद्रपूरची आराध्यदैवत माता महाकाली देवीला नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मातेला पिवळं पडोल परिधान करून, नवीन शालु घालून विविध दागिने घालुन देवीचा शृंगार करण्यात आला. दरम्यान, मंदिर हार फुलांनी सजविण्यात आले. मंदिराच्या पुरोहितद्वारे मंदिर व्यवस्थापक सुनील नामदेव महाकाले यांनी घटपुजन, मातेची महाआरती केली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.
रविवारी सकाळी मंदिराच्या अगदी समोर हळदी उत्सव झाला. मंदिरातील सेवेकरी, भक्त मंडळींनी हळद उधळुण मोठ्या थाटात उत्सव साजरा केला. त्यानंतर श्री महाकाली मंदिर व्यवस्थापक, सेवेकरी तसेच भक्त मंडळी एकविरा देवीच्या घटस्थापनेकरिता अंचलेश्रवर मंदिर मार्गे वाजत गाजत मिरवणूक काढून एकविरा मंदिरात पोहचले.
यावेळी एकविरा भक्त मंडळीनी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली. एकविरा मातेच्या पुजेला अभिषेक प्रकाश महाकाले व सायली अ. महाकाले यांच्या हस्ते पूजा, अभिषेक व घटस्थापना, आरती करण्यात आली. त्यानंतर एकविरा मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
रांगेतील शेवटच्या भक्तांनाही मिळणार देवीचे दर्शन
दररोज सकाळी सहा वाजता अभिषेक व आरती त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता देवीला नैवेद्य दाखवून परत मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता आरती. त्यानंतर रांगेत शेवटचा भक्त असेपर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू राहणार आहे.
अष्टमी, नवमीला महापुजाअष्टमीच्या तिथीला होम हवन करण्यात येणार आहे. नवमीच्या तिथीला महापुजा, पहाटे देवाचे स्नान, पंचामृतने अभिषेक करण्यात येणार आहे. देवीला नवीन वस्त्र परिधान करून विविध दागीणे घालण्यात येणार आहे. नवमीला दुपारी दोन वाजता परंपरेनुसार महाकाले परिवारातील सुहासीनींच्या हस्ते देवाची पूर्ण आरती, पूर्णा आरती करण्यात येणार आहे. नंतर घट हलविण्यात येणार आहे.