राजेश मडावी
चंद्रपूर : जुन्या काळात पाण्याची गरज भागविणाऱ्या पायऱ्यांच्या विहिरीला पुण्याकडे ‘बारव’, तर चंद्रपूरसह पूर्व विदर्भात ‘बावडी’ म्हटले जाते. या ऐतिहासिक विहिरींच्या जतन-संवर्धन व पुनरुज्जीवन योजनेत राज्य सरकारने राज्यातील केवळ ७५ बावडींचा समावेश केला. त्यामुळे चंद्रपुरातील गोंडकालीन बावडींना या योजनेतून वगळण्यात येणार का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चंद्रपूरवर गोंडराजांची ७०० वर्षे सत्ता होती. महाराष्ट्रात बारवांच्या निर्मितीला सातवाहन काळापासूनचा इतिहास असल्याचे अभ्यासकांनी नाेंदविले आहे. राज्यात २० हजार बावडी असल्याचे शासनाने मान्य केले. मात्र, बारव म्हणजे आपल्याकडील बावडी निर्मिती व त्याची गोंडकालीन स्थापत्यशैली संपूर्ण राज्यात आगळेवेगळे वैशिष्ट्य राखून आहे. काही बावड्या ढासळल्या व बुजल्या आहेत. पण चंद्रपूर, भद्रावती आणि चिमूर येथील काही बावडींतील पाण्याचा आजही वापर होतो. या बावडी पूर्व विदर्भात आढळणाऱ्या बावडींच्या अस्सल प्रातिनिधिक ठराव्यात इतक्या सुरक्षित, मौलिक व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इको-प्रो संस्था दरवर्षी स्वच्छता व जतन-संवर्धन मोहीम राबविते; पण शासनाकडून उपेक्षा सुरू असून, पुरातत्त्व विभागानेही कानाडोळा केला आहे.
केवळ गॅझेटिअर नोंद पुरेशी नाही
१८ मे २०२३ रोजी पर्यटन व सांस्कृतिक विभागांतर्गत गठीत तज्ज्ञांची समिती ७५ बारव संरक्षित करण्यासाठी मार्गदर्शन करेल. बारवांचे गॅझेटिअर करण्यासाठी कार्यकारी संपादक व सचिवांना मदत करणार आहे. चंद्रपूर, भद्रावती, चिमूर येथील बावडींची नोंद गॅझेटिअरमध्ये होईल. मात्र, केवळ नोंद पुरेशी नसून जतन व संवर्धन योजनेत समावेश अत्यावश्यक आहे.
बावडीतील पाणी बारमाही
रचना व आकारावरून पायऱ्यांची विहीर, पायऱ्यांची तळी, कुंड, पुष्करणी (देवड्या असलेली शोभिवंत विहीर), पोखरण व वर्तुळाकार उतरत्या पायऱ्यांची विहीर, असे प्रकार अभ्यासकांनी पाडले. गोंडराजांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने पायऱ्यांच्या बावडी बांधल्या आहेत. या बावडींतील पाणी कधीच आटत नाही.
पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन
बारव व पायविहिरी एकच असून, केवळ विहीर हा वेगळा प्रकार आहे. बारवांची खोली ही एका मर्यादेपेक्षा अधिक नसते. शिवाय यातील पाण्याची पातळी एका मर्यादेपेक्षा अधिक वाढत नाही. बारवांमध्ये पायऱ्या असल्याने, पाण्यापर्यंत जाणे शक्य होते. वैज्ञानिक उद्देश असा की, जमिनीत जे भूजलाचे साठे असतात, त्यातील एका केंद्रबिंदूवर बारव खोदलेली आढळते. अशा रचनेमुळे जमिनीखाली निर्माण होणाऱ्या हवेच्या पोकळीतून हवा बाहेर पडण्यास मदत होते, शिवाय आजूबाजूच्या विहिरींची पाणीपातळीही वाढते, अशी माहिती बारव अभ्यासक रोहन काळे यांनी नोंदवून ठेवली.
ऐतिहासिक विहीर संवर्धन योजना राज्यस्तरीय राबविताना जिल्ह्यातील विहिरींवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे शासनाने जिल्हास्तरीय योजना तयार करावी. चंद्रपूर जिल्ह्यात अशा गोंडकालीन विहिरींची संख्या मोठी आहे. राज्य योजनेतून या विहिरी वगळणे अन्यायकारक होईल.
- बंडू धोत्रे, अध्यक्ष, इको-प्रो, चंद्रपूर
चिमूरमध्ये चार बावडींतील पाण्याचा वापर शेतकरी करतात. कोरीव नक्षीकामाच्या विहिरीत आरामाची व्यवस्था असून, घोडे व सैन्यांना पाणी पिण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. पण, या विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने याबाबत नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मी लक्ष वेधले.
- कवडू लोहकरे, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती, चिमूर