आचारसंहिता लागू : १० जानेवारीला मतदान तर ११ ला मतमोजणीगोंडपिंपरी : प्रभाग निहाय आरक्षणाच्या मुद्यांवरुन लांबणीवर गेलेल्या येथील नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नव वर्षाच्या प्रारंभी १० जानेवारीला मतदान तर ११ ला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली असून राजकीय वातावरण तापले आहे. तालुका स्तरावरील मोठ्या ग्रामपंचायतींना नगरपंचायत दर्जा देऊन शहराचा विकास साधरण्याचा हेतु शासनाचा आहे. येथील ग्राम पंचायतीला १७ जून २०१५ रोजी नगर पंचायतीचा दर्जा दिला. यानंतर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होण्याच्या विचाराने प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र मागील आरक्षण मुद्यावर आक्षेप नोंदविल्याने प्रशासनाच्या वतीने आक्षेपांची दखल घेवून सुधारीत आरक्षण पाडण्यात आले. यानुसारच ४ डिसेंबर रोजी गोंडपिंपरी नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.निवडणूक आयोगाकडून प्राप्त पत्रानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ८ डिसेंबरला नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारणे, नामनिर्देशन स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत, छाणणी १८ डिसेंबर, छाननीनंतर वैध यादी प्रकाशित १८ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत, अपील नसल्यास नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २८ डिसेंबर ३ वाजेपर्यंत, अपील असल्यास अपील निर्णयापासून तिसऱ्या दिवस अखेरपर्यंत, चिन्ह वाटप व निवडणूक उमेदवार अंतिम यादी, उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दिवशीपर्यंत, मतदान केंद्र यादी प्रसिद्ध ४ जानेवारी, मतदान १० जानेवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत, मतमोजणी ११ जानेवारी सकाळी १० वाजेपासून असा नियोजित कार्यक्रम आहे. (तालुका प्रतिनिधी)बिगूल वाजताच राजकीय हालचालींना वेगजानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल ४ डिसेंबर रोजी वाजला. प्रभाग निहाय आरक्षण सोडतीनुसारच कामाला लागलेल्या संभाव्य उमेदवारांनी आता पक्ष तिकीट मिळविण्यासाठी कंबर कसली असून राजकीयदृष्टया महत्त्वाची ठरणाऱ्या गोंडपिंपरी नगरपंचायतीवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांनीही चंग बांधला असल्याने राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुकास्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था अधिनस्त अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देऊन शहराच्या सर्वांगीण विकास साधण्याचा हेतू शासनाचा आहे. यानुसार मागील जून महिन्यात येथील ग्राम पंचायतीला नगरपंचायत दर्जा प्राप्त झाला. आणि काही अवधी लोटताच प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. मात्र जातीनिहाय प्रभागातील आरक्षणाबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याने प्रथम जाहीर करण्यात आलेले आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली. एकूण १७ प्रभागात जाहीर केलेल्या आरक्षणानुसार सर्वसाधारण (पुरुष गटासाठी) प्रभाग ४, ६, १३, १७ महिलासाठी राखीवमध्ये (१७,२,१) , नामाप्र आरक्षण प्रभाग क्र. ८, १२ तर महिलासाठी (३,५, ११), अनु. जाती (पुरुष-९), महिला -७, अनु.जमातीसाठी पुरुष गटासाठी प्रभाग -१० तर महिला राखीव प्रभाग -१५, १४ असे आरक्षण आहे.
गोंडपिंपरी नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By admin | Published: December 09, 2015 1:23 AM