कन्हाळगाव अभयारण्य : पर्यटनातून रोजगार वाढीची आशा
निलेश झाडे / चंद्रजीत गव्हारे
गोंडपिपरी : उद्योगविरहित असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात रोजगाराचा दुष्काळ आहे. अशात कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाले. अभयारण्याला भेट देण्यासाठी व वाघाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकामुळे रोजगाराला चालना मिळेल, ही आशा बेरोजगारांना आहे. त्यामुळे अभयारण्यात पर्यटन केव्हा सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोंडपिपरीचे नाव मागासलेल्या तालुक्यात समाविष्ट आहे. तालुक्यातून तीन नद्या वाहत असल्या तरी येथे सिंचनाच्या सुविधा नाही. परिणामी येथील शेती बेभरवश्याची झाली. येथे उद्योग नसल्याने तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. अशात तालुक्यातील वनक्षेत्राचा समावेश असलेल्या कन्हाळगाव अभयारण्याची घोषणा करण्यात आली. कन्हाळगाव अभयारण्यातील वनक्षेत्रात वाघ, बिबटे, अस्वल, तृणभक्षक प्राण्यांची संख्या मोठी आहे. जैवविविधतेने नटलेल्या या क्षेत्रात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे कन्हाळगाव अभयारण्याला पर्यटकांची पसंती मिळणार आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. पर्यटकांसाठी अभयारण्य केव्हा खुले होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
आंतरराज्यीय पर्यटनाला वाव
कन्हाळगाव अभयारण्यात जैवविविधता तसेच दुर्मीळ प्राण्यांचा अधिवास आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या अभयारण्याला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे येथे आंतरराज्यीय पर्यटनाला वाव आहे.
बॉक्स
दहा वाघ, २३ बिबटे
कन्हाळगाव अभयारण्यात दहा वाघ आणि २३ बिबटे असल्याची नोंद वनविभागाकडे आहे. मात्र यापेक्षा अधिक वाघ, बिबट्यांचा येथे आवास असल्याचा दावा वन्यजीव प्रेमी करतात.
कोट
कन्हाळगाव अभयारण्याचे व्यवस्थापन नेमके वनविकास महामंडळाकडे असणार की वनविभागाकडे, हे अद्याप ठरलेले नाही. मात्र वनविभागाने अभयारण्याच्या विकासासाठी अनेक प्रस्ताव तयार केलेले आहेत. हे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. व्यवस्थापनाची जबाबदारी कुणाकडेही गेली तरी अभयारण्याच्या माध्यमातून येथील जैवविविधतेचे संरक्षण होणार आहे. सोबतच रोजगाराची निर्मिती होईल.
- अरविंद मुंढे, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग
100721\images (13).jpeg
अभयारण्य