जिवती : महापांढरवाणी येथे स्व. गोदरू पाटील जुमनाके यांच्या नावाचा नवीन चौक तयार करून त्या चौकाला गोदरू पाटील चौक असे नाव देण्यात आले. यानिमित्त समाजप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला.
सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण लिंगोराव सोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. विशेषतः इयत्ता आठवीमध्ये शिकणारा गोविंद माधव सिडाम नामक विद्यार्थ्याने चक्क इंग्लिशमधून गोंडी संस्कृतीचे वर्णन निर्भीडपणे केले. या मेळाव्याचे उद्घाटन कर्णू पाटील धुर्वे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम तर मार्गदर्शक लिंगोराव सोयाम, कंटूजी कोटनाके, इसरू आडे, मोते गुरुजी, राठोड, रूपाबाई कोटनाके, अनिता धुर्वे, जागोराव कोटनाके, मारोती कोटनाके आदी उपस्थित होते. संचालन भोजू सिडाम तर प्रास्ताविक तुकाराम धुर्वे यांनी केले. आभार मोहन आत्राम यांनी मानले.
गोंडी संस्कृती ही देशाची महान आदर्श संस्कृती आहे. ती प्रत्येकाने जतन केली पाहिजे. त्याचबरोबर चांगले उच्च शिक्षण घ्यावे. जेणेकरून समाजाचा विकास व्हावा, असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. लक्ष्मण मंगाम यांनी केले.