चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतर्फे इंद्रधनुष्य स्पर्धेत सहभाग घेत उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा मान अनिकेत दुर्गे यांना मिळाला आहे.
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी इंद्रधनुष्य या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होतात. काही विद्यार्थी विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतात. सन २०२२-२३ मध्ये अनिकेतने या राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभाग घेत उत्तम भूमिका पार पाडली, तसेच सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथे एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत विद्यापीठात प्रथम मेरीट आला. त्याबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक दिनेश नरोटे यांनी (दि.१२) सोमवारी परिपत्रक काढत अनिकेतला सुवर्ण पदक जाहीर केले. अनिकेतने आपल्या यशाचे श्रेय आई- वडील, एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री कापसे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. ममता ठाकूरवार, प्रा. संतोष आडे यांना दिले.