चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या, व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील केरोडा गावाच्या शेत शिवारातून व्याहाड बूज.च्या शेतशिवरात आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान शेतकऱ्यांनी हत्ती धान पिकातून जंगल परिसरात जाताना पाहिल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकाराची माहिती शेतकऱ्यांनी सामदा वनबीटाचे वनरक्षक सोनेकर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनरक्षकानी वरिष्ठ अधिकारी यांना कळवून व्याहाड बूज. जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. शोध मोहीम दरम्यान ज्या दिशेने हत्ती गेला त्या मार्गावर हत्तीच्या पायाचे ठसे मिळाले आहेत. हत्ती व्याहाड बूज. जंगल परिसरातून उपरी जंगलात गेल्याची चर्चा सुरू आहे. त्या दिशेने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील हा जंगल परिसर उपरी, सामदा, सिर्सी या तीन वनबीटाचे कार्यक्षेत्र असल्याने जवळपास सात हजार हेक्टरवर जंगल पसरले असल्याने हत्ती कोणत्या भागात गेला हे शोधणे वनविभागासाठी कठीण झाले आहे. या परिसरात हत्तीचा शिरकाव झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच या परिसरात वाघ, बिबट्याची दहशत असल्याने पुन्हा हत्तीचा शिरकाव झाल्याने भीती निर्माण झाली आहे. या प्राण्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हत्ती हा खानाबादवरून बुधवारी पाथरी मार्गे गायडोंगरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. आणि आज तोच हत्ती व्याहाड उपरी जंगल परिसरात आल्याची माहिती मिळाली आहे. त्या दिशेने वनविभागाची शोध मोहीम सुरू केली आहे.
- प्रविण विरुटकर ,वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली.