मागण्यांना मंजुरी : मनपा बांधणार घरे, आकृतीबंधानुसार पदभरती चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या व समस्यांची सोडवणूक बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत करण्यात आली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या नेतृत्वात जिल्हयातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा सामान्य रूग्णालय, विविध नगर परिषदा व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित प्रश्नांचा निपटारा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलिप हाथीबेड, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. पी. मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, याशिवाय जिल्हयातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी, सफाई कामगारांच्या संदर्भात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला गती दिली आहे. या गतीमान मोहिमेला अधिक सक्रीय करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचीही तत्परतेने सोडवणूक झाली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी यावेळी केले. सर्व शहराची स्वस्छता करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्य तपासणीकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे प्राथमिकतेने व सहानुभूतीपूर्वक लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्हयातील अनेक ठिकाणच्या प्रलंबित प्रश्नांवर हस्तक्षेप करीत बैठकीतच तोडगा काढला. या बैठकीत अनेक प्रश्नांची शासनाच्या पुढाकाराने सोडवणूक झाल्याचे समाधान सफाई कर्मचारी संघटनेचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी) बैठकीत झालेले प्रमुख निर्णय जिल्हा सामान्य रुगणालयात आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची भरती. लाड समितीच्या शिफारशींची सर्व संस्थांमध्ये काटेकोर अंमलबजावणी महानगर पालिका सफाई कामगारांसाठी आवश्यकतेनुसार घरे शासकीय नियमानुसार अनुकंपा भरती प्रक्रीया गतीशील करणार सुटीच्या दिवशीच्या कामाचा मोबदला निश्चित करणार कालबध्द पदोन्नतीमधील प्रकरणे निकाली काढणार ठेकेदारी पध्दतीच्या कामात सफाई कामगारांच्या संस्थांना कायदयानुसार प्राथमिकता किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिले गेल्यास कारवाईचे संकेत पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्तीबाबत प्रस्ताव पाठवण्याचे आदेश. आयटीआयमधील भरतीसंदर्भातील तिढा सोडविण्याचे निर्देश.
सफाई कामगारांना आले अच्छे दिन
By admin | Published: May 05, 2017 12:56 AM