घोडपेठ : येथून जवळच असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयरन ॲण्ड पॉवर या कारखान्याने अचानक कारखान्यात काम करणाऱ्या अंदाजे १२० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. कारखान्याच्या बाहेर असलेल्या नोटीस बोर्डवर शुक्रवारी पहाटे सूचनापत्रक लावून कामगारांना कामावरून कमी केल्याची सूचना दिलेली आहे. अचानक केलेल्या कामगार कपातीमुळे कामगारांत खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळच्या पाळीत काम करण्यासाठी कामावर गेलेल्या कामगारांना कामावरून कमी केल्याची बातमी समजताच काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारखान्यात विविध प्रकारची कामे कंत्राटी पद्धतीने केली जातात. यापैकी कारखान्याने सेल्गा स्टिल इंडस्ट्रीज, देवराव भोंगळे, महालक्ष्मी कॉन्ट्रॅक्टर्स, श्री काली सेक्युरिटी सर्व्हिसेस व एपीटी या कंत्राटदारांच्या एकूण अंदाजे १२० कामगारांना कमी केले आहे. अचानक कामावरून कमी केल्यामुळे कामगारांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याबाबत कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल उधोजी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.
गोपानी व्यवस्थापनाने कायद्याच्या विरोधात जाऊन चुकीचा निर्णय घेतला आहे. कामगारांना लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- दिनेश चोखारे, सभापती, कृउबास चंद्रपूर तथा अध्यक्ष, गोपानी स्पंज आयरन कामगार संघटना, ताडाळी.