लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात उद्योगासाठी तरतूद करण्यात आली. त्यामुळे नवा रोजगारपूरक मोठा उद्योग येण्याची आशा आहे. कोळशापासून रसायन निर्मितीसाठी चार पायलट प्रकल्पांची घोषणा झाली. परंतु, त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होईल की नाही, याबाबतही अनिश्चितता आहे. अर्थसंकल्पाचे भाजपकडून समर्थन केले तर विरोधी पक्ष, विविध क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिकांनी अपेक्षाभंग झाल्याचे मत व्यक्त केले आहे.केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, डिजिटल बँकिंग देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला. यासाठी ७५ जिल्ह्यांत ७५ डिजिटल बँकिंग यूनिट्स सुरू केले जाणार आहेत. हे बँकीग युनिटस कोणत्या जिल्ह्यात तयार केले जाणार, याची माहिती जाहीर झाली नाही.शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाईल. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पैसैही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डकडून मदतीची योजना जाहीर केली. त्याचे थेट लाभ जिल्ह्याला मिळण्याची शक्यता कमी आहे. रेल्वे विकासाबाबतही जिल्ह्याला काही मिळाले नाही. कोळशापासून रसायन निर्मिती तयार करण्यासाठी चार पायलट प्रोजेक्टची घोषणा झाली. मात्र, देशातील कोणत्या क्षेत्राची निवड होते, त्यावरच पुढचे अवलंबून आहे.