चंद्रपूर : कमी मानधनावर काम करण्यास तज्ज्ञ डॉक्टर शासकीय रुग्णालयात सेवा देण्यास असहमती दर्शवीत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टरांना वाढीव मानधन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष मोरेश्वर गौरकार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
सद्य:स्थितीत मोठ्या शहरात कोविड रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होण्यासाठी दरमहा एक लाख रुपये मानधन देण्यात येते. मात्र, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टरांना मासिक साठ हजार मानधन दिले जाते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कमी मानधनावर काम करण्यास तज्ज्ञ डॉक्टर शासकीय रुग्णालयात सेवा देण्यास असहमती दर्शवीत आहेत.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांनी एप्रिल २०२१ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन संकलित करून कल्याण निधीत जमा केले आहे. या निधीतून प्रशासनाने प्रति डॉक्टर चाळीस हजार रुपये वाढीव मानधन देऊन नागपूर येथील पाच तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक दिवसाचे वेतन देऊन उभारलेल्या कल्याण निधीतून कोविड रुग्णांना तातडीने अत्यावश्यक साहित्य, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, औषधे इत्यादी उपलब्ध करण्यात येणार होते. मात्र, या निधीतून डॉक्टरांना वाढीव मानधन देण्यात येणार असल्याने रुग्णांना अत्यावश्यक साहित्य उपलब्ध होण्यास निधीची कमतरता भासणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टरांच्या मानधनात एक लाख रुपये वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी प्रकाश चुनारकर, विजयालक्ष्मी पुपरेड्डीवार, योगिनी दिघोरे, संजय लांडे, अमोल देठे, अजय बेदरे, सुशांत मुनगंटीवार, संतोष जिरकुंटावार, राजेंद्र पांडे, सुनील टोंगे, दिनेश टिपले, विकास तुरारे, किशोर मुन, सतीश दुवावार, विनोद बाळेकरमरकर, दिलीप राठोड आदींनी केली आहे.
बाॅक्स-
सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षक या महामारीच्या काळात एक दिवसाचा पगार डॉक्टरांना वाढीव मानधनासाठी देत आहेत. असेच उत्तरदायित्व डॉक्टर आणि शासनाने दाखविल्यास रुग्णांच्या सुविधेसाठी निधीची कमतरता भासणार नाही.
- मोरेश्वर गौरकार,
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक, चंद्रपूर