पतीचे अकाली निधन झाल्यानंतर बहुतांश महिलांच्या वाट्याला हालअपेष्टाच येतात. यामध्ये काही महिलांची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्यांना आर्थिक ताण जात नाही. मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले तर त्या महिलेवर आभाळ कोसळते. अशा वेळी जगणे कठीण होऊन बसते. या महिलांना आधार मिळावा, त्यांना आर्थिक ताण पडू नये यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मानधन देणे सुरू केले आहे. शासकीय निकषांमध्ये बसत असलेल्या विधवा महिलांना हा लाभ दिला जातो. त्यामुळे पडत्या काळामध्ये काही प्रमाणात का होईना,आर्थिक आधार होत आहे.
विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी संपूर्ण कागदपत्रांसह तलाठी किंवा तहसील कार्यालयात अर्ज करावा, अर्ज आल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयातील समिती कागदपत्र तपासून प्रकरण मंजूर करते. त्यानंतर संबंधित महिलांना शासकीय योजनांतून मानधन दिले जाते. सद्य:स्थितीत १३ हजार ४१६ महिलांना मानधन दिले जात असून कोरोनाच्या महामारीमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
कोरोना संकटात पती गमावलेल्या आणि शासकीय मदतीसाठी अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ९८ महिलांपैकी ३६ विधवा महिलांना शासकीय योजनेचा लाभ सुरू झाला आहे. दरम्यान, अन्य महिलांचेही कागदपत्र गोळा करणे सुरु आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील लाभार्थी
संजय गांधी निराधार अनुदान योजना (सर्वसाधारण) -४७४४
संजय गांधी निराधार अनुदान योजना( अनु. जाती)-१२२६
संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनु. जमाती)-१४८६
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना - ५८११
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना - १४९
कोट
निराधार तसेच विधवा महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. शासकीय निकषांत बसलेल्या सर्व महिलांना या योजनांचा लाभ दिला जातो. यासाठी संबंधित तहसील कार्यालयामध्ये महिलांनी अर्ज करावा. समितीमार्फत निवड झाल्यानंतर दर महिन्यात मानधन मिळते.
- डाॅ. कांचन जगताप
तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.