विलास गरूड : जिल्हा संघटन समिक्षा बैठकीत प्रतिपादनचंद्रपूर : इंग्रजी येण्यापूर्वी व गेल्यानंतर या भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते व सरकारे हे उच्चवर्णीय, जातीयवादी आणि भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबविणारे असल्यामुळेच देशात, गरिबी, बेरोजगार अंधश्रद्धा वाढून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. या देशाची व्यवस्था विषमता पोसणारी व भांडवलदार धर्जिणी असल्याचे मत बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी व्यक्त केले.स्थानिक बॅरिस्टर खोब्रागडे सांस्कृतिक भवनात १ आॅक्टोबर रोजी बसपा चंद्रपूर जिल्हा संघटन समिक्षा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात केलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदीमुळेच या देशातील दलित-आदिवासी-ओबीसी व अल्पसंख्यांक मुस्लीम या बहुजन समाजातील घटकांचा थोड्याफार प्रमाणात विकास होऊ शकला. परंतु विद्यमान सरकार या बहुजन समाजाला विकासापासून वंचित ठेवून पुन्हा गुलाम करण्यासाठी आरक्षण संपविण्याची भाषा करून आरएसएसचा छुपा अजेंडा अंमलात आणण्याचे षडयंत्र करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.शासकीय विश्रामगृहापासून कार व मोटारसायकल रॅलीने कार्यकर्ते डॉ. आंबेडकर चौकात आले. तेथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विलास गरूड यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह माल्यार्पण केले व डॉ. आंबेडकर चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत पायदळ रॅली काढून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमस्थळी फटाके फोडून आतीषबाजी करण्यात आली. त्यांचे गुलाबपुष्पांच्या हाराने स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी बसपात प्रवेश घेतला. या जिल्हा संघटन समिक्षा बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष क्र्रिष्णा बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव नानाजी देवगडे, प्रदेश प्रभारी प्रेम रोडेकर, भिमेंद्र कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन पूर्व विदर्भ झोन कॉर्डिनेटर सुशिल वासनिक यांनी तर आभार जिल्हा महासचिव सुधाकर तेलसे यांनी मानले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी व गरिबीसाठी शासनच जबाबदार
By admin | Published: October 03, 2015 1:00 AM