दीपक साबनेलोकमत न्यूज नेटवर्कजिवती : घर धूरमुक्त करण्यासाठी व जंगलतोड कमी करण्याच्या हेतूने शासनाने घरोघरी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅसचा मोफत पुरवठा केला. परंतु सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असल्याने महिलांवर शेगडीवरून परत चुली पेटविण्याची वेळ आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली. सततची वाढणारी महागाई पाठ सोडत नसल्याने गोरगरिबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले आहेत. संसाराचा गाडा कसा हाकलावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच सिलिंडरच्या किमतीत वाढ होऊ लागल्याने जनता त्रस्त झाली आहे. १०३० रुपये प्रति सिलिंडर असा दर झाला आहे. याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. या सर्व वस्तूंच्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांना होत आहे. सिलिंडर भाववाढ ग्रामीण भागातील ग्रामस्थांना परवडणारी नसल्याने त्यांना पुन्हा एकदा शेगडीवरून चुलीकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
सबसिडीही बंदशासनाकडून सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. मिळत असलेल्या सबसिडीमुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळत होता. परंतु सिलिंडरवर मिळणारी सबसिडी आता बंद करण्यात आली. सिलिंडरच्या दरात कपात करण्याची मागणी तालुक्यातील गृहिणींकडून होत आहे.
सरपणासाठी नागरिक जंगलातघरगुती सिलिंडरच्या दिवसेंदिवस वाढत्या किमतीमुळे व वाढत्या महागाईने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. गृहिणींना परत चूल पेटविण्याची वेळ आल्यामुळे चुलीसाठी लागणारे सरपण जमा करण्याकरिता जंगलतोड होऊ शकते. त्यामुळे वनविभागापुढेही जंगलतोडीचे आव्हान उभे ठाकले आहे.
परिस्थिती जेमतेम असल्याने महाग सिलिंडर विकत घेणे परवडणारे नाही. अगोदरच वाढती महागाई, त्यात सिलिंडरचे वाढते भाव यामुळे चुलीवर स्वयंपाक केल्याशिवाय इलाज नाही. या सततच्या महागाईने घर चालविणे खूप कठीण झाले आहे. -इंदूबाई शिवदास शिनगारे, गृहिणी