सरपंच, उपसरपंचांचे तहसीलदारांना निवेदन
भद्रावती : सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोविडकाळात विमा सुरक्षाकवच देण्यात यावे, या मागणीबाबतचे निवेदन तहसीलदार महेश शितोळे यांना भद्रावती तालुक्यातील सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य यांच्याद्वारे देण्यात आले.
सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मागील वर्षभरापासून प्रशासकीय कर्मचाऱ्यांसारखे आपापल्या गावात फ्रंटलाइन वर्कर म्हणून गावस्तरावर गावकऱ्यांच्या जीवनासाठी नि:स्वार्थ सेवा प्रदान करीत आहेत.
गावांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तसेच गाव सुरक्षित ठेवण्याकरिता कसोशीने प्रयत्न करीत आहेत. हे करीत असताना कोणत्याही बांधवांना व भगिनींना कोरोनाची लागण झाली आणि त्यात ते दगावले, तर त्यांच्या कुटुंबावर फार मोठे संकट येईल व कुटुंब उघड्यावर पडेल आणि म्हणूनच सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या कुटुंबाला सहानुभूतीचा आधार म्हणून विमा सुरक्षाकवच देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आजपर्यंत कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेने सरपंच, उपसरपंच, सदस्यांबाबत सुरक्षेच्या हेतूने कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे आपल्या स्तरावर ग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांना विमा सुरक्षाकवच व इतर कर्मचाऱ्यांसारखी मदत तातडीने प्रदान करण्यात यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी चंदनखेडा ग्रामपंचायत सरपंच नयन बाबाराव जांभुळे, पानवडाळा ग्रामपंचायत सरपंच प्रदीप शंकर महाकुलकर, डोंगरगाव खडीचे उपसरपंच मुकेश भास्कर तसेच अन्य उपसरपंच, सरपंच व सदस्य उपस्थित होते.