चंद्रपूर: पदवीधर मतदार संघाची विधान परिषद निवडणूक आज शुक्रवारी शांततेत पार पडली.ही निवडणूक सुशिक्षितांसाठी असली तरी या सुशिक्षितांनी जणू निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचेच चित्र आज दिसून आले. पदवीधरांच्या निरुत्साहामुळे जिल्ह्यात केवळ ३२.१४ टक्के मतदान होऊ शकले.विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. यात यात भाजपाचे अनिल सोले, काँग्रेसचे डॉ. बबन भाऊराव तायवाडे, पांडुरंग संभाजी डबले, अब्दूल माजीद सिध्दीकी, अर्चना चंद्रहास महाबुधे, अमोल भिमराव हाडके, कराडे राजेंद्र साहेबराव, किशोर उत्तम गजभिये, गोकूल किसनराव पांडे, चंद्रकांत वासुदेव गेडाम, महेंद्र आनंदराव निंबार्ते, महादेव नारायण पाटील, राजेंद्र नामदेव लांजेकर, तिर्थराज भेजराम हरीणखेडे यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांचे भाग्य आज मशीनबंद झाले. या निवडणुकीसाठी प्रशासनाने ४४ मतदान केंद्राची व्यवस्था केली होती. प्रारंभापासूनच मतदारांचा निरुत्साह दिसून आला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ३८ हजार १३१ मतदारांपैकी केवळ १२ हजार २५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचलेच नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यात एकूण १७६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करण्यात आले. एका मतदान केंद्रावर एक अधिकारी व तीन कर्मचारी एक पोलीस कर्मचारी अशी सुरक्षा व्यवस्था होती. निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर अनुचित घटना घडली नाही. २४ जूनला मतमोजणी होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
निवडणुकीसाठी पदवीधर निरुत्साही
By admin | Published: June 21, 2014 1:24 AM