स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
वरोरा : शासनातर्फे अल्प प्रमाणात नोकर भरती सुरु असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे स्वयंरोजगारासाठी बँकेतून कर्ज मागितल्यास निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.
अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
कोरपना : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये परिसरात वाहनांची संख्या वाढली. रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा
सिंदेवाही : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, योजना राबविल्या जात आहेत. मात्र योजनांची माहिती नसल्याने नागरिकांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
बसस्थानकाचा प्रश्न निकाली काढावा
कोरपना : तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोरपना येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट बघावी लागते. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून येथील बसस्थानकाचा प्रश्न अधांतरी असून आजपर्यंत हा प्रश्न निकाली लागला नाही. कोरोना संसर्गामुळे मोजक्या बसफेऱ्या सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट बघावी लागते. मात्र बसस्थानक नसल्याने अडचण जात आहे. त्यामुळे येथील बसस्थानकाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्मशानभूमींची दुरुस्ती करा
चंद्रपूर : जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात दहन व दफनभूमी बांधण्याची योजना काही वर्षांपासून हाती घेण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील काही गावातील स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
रोहयोची कामे सुरु करण्याची मागणी
चंद्रपूर : काही गावांतील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या संकटामुळे गावातील काही नागरिकांकडे कामच नसल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालन पोषण करताना अडचण येत आहे.
‘ते’ विद्युत खांब बदलविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे धोका होण्याची शक्यता असून सदर खांब बदलविण्याची मागणी आहे.
समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी
जिवती: शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात नगरपंचायतीतडे निवेदनही देण्यात आले. शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पण नागरी समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
विरंगुळा केंद्राकडे मनपाचे दुर्लक्ष
चंद्रपूर : येथील नव्याने अस्तित्वात आलेल्या तुळशीनगर परिसरात विरंगुळा केंद्र आहे. मात्र केवळ नामफलक लावून संबंधित मोकळे झाले आहे. येथील ज्येष्ठांना बसण्यासाठी या केंद्राची दुरुस्ती करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, या विळंगुळा केंद्रामध्ये झुडपे तसेच गवत वाढले आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, याबाबत अनेकवेळा निवेदनही देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह सुरू करा
गडचांदुर : समाज कल्याण विभागाच्या वतीने शासनमान्य खासगी संस्थेच्या माध्यमातून दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु आहेत. मात्र यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी फारच कमी जागा आहेत. त्यामुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहतात, त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वसतिगृह सुरु करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.