नागभीड : तालुक्यात ३१ हजार ८३५ कार्डधारक आहेत. यातील २८ हजार ३३८ कार्डधारकांना शासनाकडून अन्नधान्न्याचा पुरवठा होत आहे. मात्र, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये ‘आळस’ मोठ्या प्रमाणावर वाढत असून शेतातील कामावर कोणी यायला तयार नाहीत, असेही बोलले जात आहे.
कोणीही उपाशीपोटी राहू नये, हे शासनाचे धोरण आहे. या धोरणाचा एक भाग म्हणूनच शासन विविधता योजनांच्या माध्यमातून अतिशय अल्पदरात गरीब व्यक्तींना धान्याचा पुरवठा करीत आहे. नागभीड तालुक्याचा विचार करता नागभीड तालुक्यात अंत्योदय योजनेचे ९ हजार ३३२ लाभार्थी आहेत. या लाभार्थींना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ आणि एक किलो साखर देण्यात येत आहे. गहू दोन रुपये प्रति किलो, तांदूळ पाच रुपये तर साखर २० रुपये किलो असे याचे दर आहेत.
धान्य वितरण प्रणालीत प्राधान्य गट हा दुसरा गट आहे. यात १९ हजार ६ लाभधारक आहेत. यात घरातील सदस्यसंख्या लक्षात घेऊन धान्य देण्यात येते. या योजनेत एका व्यक्तीस ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अशा ५ किलो धान्याचा समावेश आहे. कोणतेही धान्य न मिळणारे तालुक्यात ३ हजार ४९७ कार्डधारक आहेत, अशी माहिती आहे.
बॉक्स
आळशीपणा वाढला
अतिशय अल्पदरात लोकांना धान्य उपलब्ध होत असल्याने लोकांमध्ये कमालीचा आळशीपणा वाढला आहे, अशा चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत. या प्रकारामुळे शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. मात्र, घरातील महिलांवर यामुळे आणखी जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. घरखर्च चालविण्यासाठी घरातील महिलेला नेहमीच कामावर जावे लागते. काही कुटुंबवत्सल पुरुषही कामावर जाऊन कुटुंबाची जबाबदारी उचलत असतात. पण, बहुतेक पुरुषमंडळी कामावर जाण्याचे टाळतात, असा आरोप आहे. एका विशिष्ट रुपयांमध्ये दिवसभर काम करीत बसण्यापेक्षा हुंड्याने काम मिळविण्याकडे आता या लोकांचा कल वाढत आहे. तर, तीन-चार लोकं मिळून हुंड्याने मिळालेले काम दोन-चार तासांत उरकून घेणे व दिवसभर आरामात गावात राहणे ही पद्धत रूढ होत असल्याचे दिसते.