घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : आचारसंहिता तोंडावर आहे. दसऱ्यानंतर केव्हाही लागू शकते. त्यातच रविवारी सुट्टी. अशा परिस्थितीत ग्रामसभा घेऊन तीन दिवसांत ग्रामसभेत केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव पारित करण्याचे आदेश धडकले. मात्र, अवधी कमी असल्याने हा ठराव घेण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तरीही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी हे ठराव एकदाचे पारित करून प्रशासनाच्या डोक्यावरील बोझा कमी केला आहे.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभा आयोजित करून तसे ठराव पारित करावेत, असे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले. या ग्रामसभा ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित कराव्यात असेही या आदेशात म्हटले आहे. हे आदेश शिरसावंद्य मानून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी असे ठराव पारित केले आहेत.
पुण्याच्या पंचायतराज संचालकांनी हे आदेश ८ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशाचा संदर्भ देऊन नागभीड येथील गटविकास अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी तालुक्यातील सर्व सरपंच, प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिले. विश्वसनीय माहितीनुसार गटविकास अधिकाऱ्यांचे हे आदेश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या हातात पडल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेची नोटीस "कागदावर" काढून ग्रामसभेच्या हजेरी बुकावर ग्रामस्थांच्या सह्या आणि अंगठ्यांची नोंद करून ठराव बुकावर केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पारित केला व लगोलग पंचायत समितीला आदेशानुसार रवाना केला. आता पंचायत समिती हे ठराव संबंधित विभागाला सुपुर्द करणार, अशी माहिती आहे.