न्यायालयाचा निर्णय : निकालाच्या मतमोजणीतील चुकीचा फटकाआक्सापूर : गेल्या २० महिन्यापूर्वी तालुक्यातील मौजा करंजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या दरम्यान झालेल्या मतमोजणीत करण्यात आलेल्या चुकीमुळे दोन विजयी उमेदवारांना पदापासून वंचित राहावे लागले होते. अखेर न्यायालयातून न्याय मिळून करंजी येथील तुकेश वानोडे, विमल कतलाम यांना २० महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर ग्रा.पं. सदस्यत्व प्राप्त झाले आहे. विजयी उमेदवारांना पराभवच्या यादीत टाकल्याची ही कदाचित पहिलीच घटना असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे निवडून आल्यानंतरही पराभवाची मानहानी स्विकारावी लागल्याने अखेर त्या दोन्ही विजयी उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.तालुक्यातील मौजा करंजी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ४ आॅगस्ट २०१५ रोजी पार पडली. याच दरम्यान मतमोजणी दिनी प्रभाग क्रं. दोन मधून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविणारे तुकेश पत्रुजी वानोडे व अनु.जामती प्रवर्गातील विमल कतलाम यांना कमी मते मिळाल्याचे सांगून पराभूत झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अमान्य करीत वरील दोन्ही उमेदवारांनी गोंडपिपरी न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केली. याच दरम्यान ईव्हीममधील काळजीपूर्वक चाचपणी व त्यानुसार निकालाअंती वरील दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचा निर्णय गोंडपिपरी न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिला.याच आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी करंजी येथील तुकेश वानोडे व विमल कतलाम यांना निवडणुकीत विजयी घोषित करण्यासंबंधी तसेच ग्रा.पं. सदस्यत्व प्राप्त झाल्याचा आदेश काढून ग्रामपंचायतीला कळविले आहे.२८ एप्रिल २०१७ रोजी सदर दोन्ही विजयी उमेदवारांनी सदस्यत्व स्विकारले असून तब्बल २० महिन्याचा दीर्घ कालावधी लोटल्याने व पराभवाच्या यादीत समाविष्ट करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आपली नाहक मानहानी होऊन मानसिक त्रास झाला. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तुकेश वानोडे यांनी केली आहे. (वार्ताहर)
२० महिन्यानंतर मिळाले ग्रामपंचायतीचे सदस्यत्व
By admin | Published: May 01, 2017 12:41 AM