राजेश बारसागडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : वनविभागाच्या अधिकारात येत असलेल्या मात्र मागील ३० वर्षांपासून मधुकर मोहुर्ले यांचा कब्जा असलेल्या आणि २१ वर्षांपासून सर्व शासकीय कागदोपत्री नोंद असलेल्या शेतात विविध प्रकारच्या उभ्या पिकांवर शेतमालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर फिरविला. यामुळे निराधार विधवा महिलांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील असून ताराबाई मधुकर मोहर्ले व हिराबाई मधुकर मोहुर्ले अशी अन्यायग्रस्त महिलांची नावे आहेत. दोघीही जवळच्याच पळसगाव(खुर्द )या गावात राहतात. मधुकर मोहुर्ले हे भूमिहीन होते. त्यांना दोन पत्नी आहेत. त्यांनी जवळपास ३० वर्षांपासून ओवाळा येथील गट क्र.९७ या वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून धान्य व अन्य पीक उत्पादन करीत उदरनिर्वाह करीत होते आणि सन २००१ मध्ये त्यांच्या अतिक्रमणित जागेची शासकीय कागदोपत्री नोंद करण्यात आली. या जागेचा त्यांना गाव नमुना एक ई पंजी, ग्रामपंचायतीचा दाखला, वनहक्क गाव समितीचा दाखला, नकाशा व अन्य दाखले मिळाले आहेत. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या दोन्ही पत्नी ताराबाई मोहुर्ले व हिराबाई मोहुर्ले यांच्या नावाने सदर जमीन हस्तांतरित करण्यात आली. त्यांच्याकडे दुसरी मालमत्ता नाही. त्या दोघीही वृद्ध असून सदर शेतीच्या भरवशावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो; मात्र अचानक कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांच्या शेतावरील उभ्या पिकांवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावातील काही लोकांना हाताशी धरून ट्रॅक्टर चालवून पिके मातीमोल केली. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.वस्तुत: सदर जमीन ही वनविभागाच्या अधिकारात येते; मात्र अधिकाराचा दुरुपयोग करून सरपंच निशा राजू सोनटक्के, उपसरपंच दयाराम गुंतीवार, ग्रा.पं.सदस्य बंडू शेंडे, ग्रा.पं.सदस्य मालता मोहुर्ले,शारदा मसराम, तंमुस अध्यक्ष मुखरू उईके आदींनी गावातील इतर लोकांना हाताशी धरून या अनुचित प्रकाराचे दर्शन घडविले. मोहुर्ले यांचे गट नं.९७ चे शेत स्वतंत्र असून गावाच्या स्मशानभूमीपासून दूर आहे. याच गट नं.मध्ये गावातील शामराव मोहुर्ले यांचे शेत आहे.मात्र त्यांच्या पिकाला सुरक्षित ठेवण्यात आले, असा आरोप आपद्ग्रस्त महिलांनी केला असून दीड लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही केली आहे.
आम्ही तळोधी पोलिसात तक्रार दाखल केली असता, प्रथम टाळाटाळ करण्यात आली. नंतर तक्रार दाखल केली. मात्र, अजूनपर्यंत आरोपींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच गुन्हा दाखल केल्याची प्रतही देण्यात आलेली नाही. शिवाय तहसीलदारांकडे तक्रार नोंदविली असता, त्यांनीही कुठलीही चौकशी केली नाही.- ताराबाई मधुकर मोहुर्ले अन्यायग्रस्त महिला शेतकरीरा. पळसगाव (खुर्द), ता. नागभीड
माझ्या माहितीनुसार गट नं. ९७मध्ये मोहुर्ले यांच्या कुटुंबाच्या कुठल्याही व्यक्तीच्या नावाची नोंद नाही. म्हणून आम्ही ती जागा कब्जात घेतली. त्यावेळी त्यांना सूचना देणे गरजेचे वाटले नाही.- निशा सोनटक्के, सरपंचग्रामपंचायत ओवाळा, ता. नागभीड