लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बा. /सावरगाव : नागभीड तालुक्यातील नवानगर, तळोधी येथील मनोहर फकिरा पचारे यांच्या घरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून अवैध दारू असल्याची माहिती मिळताच तळोधी पोलिसांनी धाड टाकून १ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नवानगर येथील मनोहर फकिरा पचारे याला अटक केली आहे.तळोधी, सावरगाव, वलनी, वाढोणा, बाळापूर, गोविंदपूर, गिरगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. दरम्यान, नवानगर (तळोधी) येथील मनोहर फकिरा पचारे याचे घरी दारूसाठा असल्याची माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिली असता तळोधी पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळी उपसरपंच राजेश घिये, ग्रामपंचायत सदस्य जिवेश सयाम, ग्रा.पं. सदस्य विलास लांजेवार, ग्रा.पं. सदस्य महेश नंदनवार उपस्थित होते. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर, पोलीस उपनिरीक्षक आकाशकुमार साखरे, पोलीस हवालदार शांताराम चनेकर, पोलीस शिपाई विनोद चौधरी यांनी केली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.