नागभीड : वृक्षारोपणाचे धडक कार्यक्रम १ जुलै रोजी पार पडले. मात्र ग्रामपंचायती सोडून अन्य कोणत्याही विभागास संगोपनाची तरतुद नसल्याने लावलेली झाडे जगवायची कशी, असा प्रश्न अन्य विभाग करीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व्यतीरिक्त इतर विभागांनाही आर्थिक तरतूद करून देण्याची मागणी होत आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाच्या ऱ्हास होत आहे. हा ऱ्हास भरुन काढण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षापासून वृक्षारोपणाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे वृक्षारोपण होत असले तरी अनेक ठिकाणी वृक्षारोपण केवळ कागदावरच आहे. अनेक ठिकाणी तर वृक्षारोपण करायचे म्हणून करीत आहेत. गांभीर्य कुठेच दिसत नाही.या पार्श्वभूमीवर यावर्षी महाराष्ट्र शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात उद्दीष्ट देण्यात आले आहे. संस्था, स्वयंसेवी संस्था यांनाही सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र हे उद्दिष्ट आणि सहभाग केवळ वृक्षारोपण करुन घेण्यापुरताच आहे. ग्रामपंचायती वगळता अन्य कोणत्याही विभागास वृक्षारोपण केल्यानंतर त्या रोपट्याचे संगोपण करण्यासठी तरतुद नसल्याने अन्य विभागात थोडी उदासिनताच दिसून येत आहे. अन्य शासकीय विभागाप्रमाणेच वृक्षारोपणाच्या या धडक कार्यक्रमात ग्रामपंचायतींनाही सामावून घेण्यात आले आहे. मात्र या ग्रामपंचायती रोजगार हमी योजनेतून वृक्षारोपण करीत असल्याचे वृत्त आहे. मग्रारोहयो मधून वृक्षारोपण होत असल्याने लावण्यात आलेल्या झाडांवर खर्च करण्याचे प्रावधान असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर एका झाडावर २१०० रुपये खर्च करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. अशीच तरतुद अन्य विभागांसाठी का करण्यात येवू नये, असा सवाल अन्य विभाग करीत आहते. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीप्रमाणेच अन्य विभागांनाही वृक्षलागवड संगोपनासाठी तरतूद हवी
By admin | Published: July 02, 2016 1:13 AM