सिन्देवाही तालुक्यातील सर्वात मोठी सतरा सदस्य असलेल्या नवरगांव ग्रामपंचायत अंतर्गत व्यावसायिकांना आणि निवासी राहण्यासाठी लाखो रूपये खर्च करुन बसस्टँड परिसरात दोन, बाजार चौकात दोन, जिल्हा परिषद इमारतीजवळ दोन, आझाद चौक परिसरात तसेच गुजरी चौक येथे अशा एकूण नऊ इमारत चाळी बांधण्यात आल्या. या चाळींमधून ४२ किरायेदार आहेत. गावातील रूम किरायापेक्षा ग्रामपंचायत चाळीतील रूमचा किराया अत्यंत कमी आहे. त्यामुळे बऱ्याच किरायेदारांचा कल ग्रामपंचायत चाळीकडेच आहे. यातील काही किरायेदार हे नोकरदार असून १५-२० वर्षांपासून राहतात. शिवाय महिना लोटला की कोणी विचारणारे नसल्याने आणि २०२० हे वर्ष कोरोनामुळे काहींचे व्यवसाय डबघाईस आल्याने किरायेदारांची थकबाकी मागील काही वर्षात वाढत गेली. त्यामुळे आजघडीला ४२ किरायेदारांवर ३० लाख ३२ हजार ५५० रूपये किराया थकबाकी आहे.
ग्रामपंचायतीमधील काही सदस्यांचे किरायेदारांसोबत नेहमीचे संबंध असतात. त्यामुळे जबरदस्तीने वसुलीसुद्धा टाळली जाते. यातूनही थकबाकीचा आकडा फुगत असल्याचे बोलले जात आहे.
शासनाकडून मिळणाऱ्या विविध फंडातील रकमेमधून आणि ग्रामपंचायत अंतर्गत मिळणाऱ्या विविध टॅक्समधून ग्रामविकासाची कामे करावी लागतात. परंतु येथे ३० लाखांची रक्कम थकीत असल्याने प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.