घुग्घुस : घुग्घुस गावाच्या मध्यभागी असलेल्या नियोजित क्रीडांगणाच्या खुल्या जागेवर ग्रामपंचायत गाव परिसरातील जमा केलेला कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरत आहे.
यात प्लास्टिकचे अधिकत्तर प्रमाण असल्याने प्लास्टिक वाऱ्याने उडत जाऊन लोकवसाहतमधील घरात जात आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावल्याने होत असलेल्या वायू प्रदूषणाने नागरिक त्रस्त आहे.
लोकवसाहतीच्या मध्यभागी असलेल्या नियोजित क्रीडांगणाच्या खुल्या जागेचा ग्रामपंचायत कचरा यार्ड म्हणून उपयोग करीत आहे. यात अधिक प्रमाणात प्लास्टिक पिशव्या असतात. वाऱ्यामुळे त्या उडत येऊन घरात येत आहेत. त्या जाळल्या तर वायू प्रदूषण होत असते. वारंवार ग्रामपंचायतीचे लक्ष वेधून कचरा यार्ड हटविण्याची मागणी केली. मात्र, मागणीची दखल ग्रामपंचायतीने किंवा वाॅर्ड सदस्यानी घेतली नाही. वारंवार तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने तथा शहर काॅंग्रेसच्या माध्यमातून मशीन लावून साफसफाई केली होती. मात्र, कचरा टाकणे सुरूच ठेवल्याने नाईलाज होऊन क्रीडाप्रेमी युवक त्या जागेची साफसफाई करून खेळाचा सराव करीत असतात. त्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने क्रीडाप्रेमींनाही त्रास होत आहे. सदर जागेवरील कचरा यार्ड हटवावा व गावाबाहेर न्यावा, अशी मागणी वाॅर्डातील नागरिकांनी केली आहे.